नवकोकणच्या प्रसिद्धी
निमित्ताने ......
नमस्कार,
मुख्य प्रवाहातील माध्यमांत सलग १६ वर्ष काम केल्यानंतर स्थिरावण्याऐवजी नव्याने माझ्या कोकणासाठी, कोकणातील माझ्या सरळ, साध्या, प्रचंड माणुसकी असलेल्या कोकणी बांधवांसाठी कोकण विकासाच्या संकल्पनेत नवी धडपड व धाडसाने एक पाऊल पुढे टाकत आहोत. त्यासाठी “नवकोकण” हे माध्यम कोकणवासीयांच्या सेवेसाठी समर्पित करत आहोत.
-Written by लेखक हे नवकोकण.काँम या वेबसाईटचे मुख्य संपादक आहेत
कोकण या रत्नभूमीत अनेक साधू-संत, महापुरूष, समाजसेवक, साहित्यिक, राजकारणी, विचारवंत व स्वातंत्र्ययोध्दे होऊन गेले, आणि आपापल्या कार्याचा ठसा उमटवून अजरामर झाले. बदलत्या काळात भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरीक पुरस्काराने गौरवीलेली 9 भारतरत्ने कोकणातील आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक अश्या अनेक क्षेत्रात कोकणाची कामगिरी हि अतुलनीय आहे. अशा आपल्या महान वैभवशाली कोकणात आपले “नवकोकण” नावाचे माध्यम सुरु करताना अत्यंत आनंद होत आहे.
अरबी समुद्र व सह्याद्रीच्या मधल्या भागातील चिंचोळ्या पट्यात वसलेल्या कोकण हा भुप्रदेश भगवान परशुरामांची भुमी म्हणून ओळखली जाते, बदलत्या काळात साहीत्य, कला, क्रीडा, संस्कृती, संगीत, तत्वज्ञान, मनोरंजन सर्वच क्षेत्रावर मुळच्या कोकणी व्यक्तीमत्वांचा मोठा प्रभाव दिसून येतो. कोकणातून नऊ भारतरत्ने निर्माण झाली. कोकणातील जैवविविधता, नैसर्गिक, अल्हाददाई पर्यावरण व विविधीतने नटलेल्या येथील सांस्कृतीक लोकजीवनाची जगास भुरळ पडली नाही तर नवल. येथील प्रथा, पंरपरा, चालीरीती, बोलीभाषा, खानपान व नेहमीचे राहणे, जगणे सारं काही वेगळे आहे. चोखंदळ कोकणी मानसीकतेत झालेला हा बदल राजसत्तेकडून खुंटलेल्या विकासास गती देण्याची अपेक्षा ठेवून असल्याचे संकेत देऊन गेला आहे. त्यामुळे राजसत्तेची जबाबदारी वाढली आहे.
राज्याची निर्मीती असो अथवा देशाचे स्वातंत्र, गेल्या पंच्याहत्तर वर्षात राजकारणी व येथील नेतृत्वाने कोकणचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे किंबहुना कोकणचा कॉलीफोर्निया करण्याचे दिवा स्वप्न पाहीले. पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध असलेल्या कोकणचा गोवा किंवा केरळप्रमाणे पर्यटनदृष्ट्या विकासाच्या शक्यता तपासून पाऊले उचलणे गरजेचे आहे. कोकणाला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देता येईल का यासंदर्भात विचार आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकार स्तरावरून स्वतंत्र पर्यटन धोरण राबविण्याचीही आवश्यकता आहे. आता केवळ घोषणा व आश्वासनांवर काम भागणार नाही, प्रत्यक्ष कृतीही करावी लागणार आहे. कोकणातील पर्यटन, फळ लागवड, मत्सशेती, रोजगार निर्मीतीच्या सर्व संभाव्य संधीचा विचार करुन त्या अधिक प्रशस्त होण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखून त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे.
कोकण रेल्वेच्या आगमाननंतर विकासाचे चाक आणखीन जोमाने धावेल अशी अपेक्षा होती. तसे ते वांगीदाखल उदाहरणासाठी धावले, ते कोणीही नाकारू शकणार नाही. पण रेल्वेच्या उदयनानंतर कोकणाचे कोकणपण मात्र हरवू लागले आहे. कोकणी संस्कृतीने अनेक संस्कृती खानपानाच्या पध्दती आपल्या म्हणून अंगीकारल्या आहेत. कोकणात सर्रास उपलब्ध असणारे पंजाबी वा चायनीज फूड याचे उत्तम उदाहरण आहे. केरळ राज्यात पर्यटनांचा विकास झाला तो इडली डोसा या पदार्थावर, हे पदार्थ आज जगप्रसिध्द आहेत. अशी ओळख कोकणाच्या भात व मासे यांना मिळाली आहे का, जगात कोठेही जाऊन तुम्हाला हा पदार्थ मिळू शकतो का, या विषयी कोकणी पर्यटनावर बोलणाऱ्या सर्वांनीच विचार कऱण्याची गरजेचे आहे. कोकणचे ब्रँडीग करण्यासाठी कोकणवासीय कमी पडले आहेत हे खरे आहे. भुतकाळातील चुका टाळुन कोकण हा एक ब्रँड म्हणून जगासमोर नेणे गरजेचे आहे व एखाद्या ब्रँड ला मिळालेली ओळख सहजासहजी पुसली जात नाही. पेस्ट म्हणजे कोलगेट, थंड म्हणजे थम्प अप, पारले म्हणजे बिस्कीट या धर्तीवर कोकणाला ओळख देणारे बदलत्या काळातील ब्रँड शोधणे गरजेचे आहे.
याकारिता वैयक्तीक व अगदी सार्वजनीक पातळीवरही होत असलेल्या प्रयत्नाना आता राजसत्तेचे पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे. कोकण विकासाचा अभ्यास हा कागदावर व त्याचे नियोजन प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आवश्यक असलेली सत्ता व राजकीय पाठबळ कधी नव्हे ते उपलब्ध झाले आहे. यासाठी येथील नेत्यांनी परस्परातील भेद राजकीय स्वार्थ फायदे बाजूला ठेवून कोकणचा विकास हा आपल्या अजेड्यांवरचा विषय बनविणे गरजेचे आहे. कोकणात रस्ते व पायाभुत क्षेत्रात झालेल्या गंतवणुकीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याच्या कालावधीत कोकणातील राजकारण्यांसह सर्वानीच विकासाकरिता एकत्रीत मार्गक्रमण गरजेचे आहे.