Artemis 2 Mission Launch: नासाचे ‘आर्टेमिस-२’ मिशन लाँच; ५० वर्षांनंतर चंद्राकडे मानवी झेप
NASA Artemis 2 mission launch to Moon: आज सकाळी नासाच्या अंतराळयानातून चार अंतराळवीर ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्राकडे झेपावले आहेत.
Astronauts for NASA Moon Mission 2026: अमेरिकेतील फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून आज सकाळी नासाचे चार अंतराळवीर चंद्र मोहिमेसाठी झेपावले आहेत. अपोलो मोहिमेनंतर ५० वर्ष कोणत्याही मानवाने पृथ्वीपासून इतका मोठा प्रवास केला नव्हता. नासाच्या ‘आर्टेमिस-२’ अभियानाद्वारे चार अंतराळवीर चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालतील आणि सुमारे दहा दिवसांनी पृथ्वीवर परततील.
भारतीय वेळेनुसार गुरूवारी सकाळी ४:०५ वाजता प्रचंड अशा एसएलएस रॉकेट केनेडी स्पेस सेंटरमधून आकाशाकडे झेपावले. प्रक्षेपण होतानाचा रॉकेटचा ध्वनी काही किमी अंतरापर्यंत ऐकू जात होता. यावेळी हजारो लोक आणि नासा कर्मचारी हे प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित होते. प्रक्षेपण होताच त्यांनी टाळ्या वाजवून मोहिमेला सदिच्छा दिल्या.
१९६० आणि १९७० च्या दशकात सहा वेगवेगळ्या मोहिमांमध्ये १२ मानवांना अपोलो मोहिमेअंतर्गत चंद्रावर उतरविण्यात आले होते. यानंतर आजवर शेकडो अंतराळवीरांनी अंतराळात प्रवास केला. मात्र त्यांच्यापैकी कोणीही अंतराळ स्थानकाच्या पुढे जाण्याचे धाडस केले नव्हते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे ४०० किमी उंचीवर कार्यरत आहे
आज प्रक्षेपित झालेल्या नासाच्या ‘आर्टेमिस-२’ मिशनद्वारे अमेरिकेचे अंतराळवीर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच, तसेच कॅनडाचे जेरेमी हॅन्सेन हे चंद्राची प्रदक्षिणा घालतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जवळपास एक वर्ष घालवलेल्या ४७ वर्षीय कोच या चंद्राच्या परिसरात पोहोचणाऱ्या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरणार आहेत
अपोलो मिशनच्या सहा मोहिमांमध्ये २४ अंतराळवीर चंद्राजवळ पोहोचले होते. यापैकी १२ जण चंद्रावर उतरले आणि १२ जण चंद्राच्या कक्षेत राहिले होते, सर्व अंतराळवीर पुरुष होते.
आर्टेमिस-२ मोहिमेत अंतराळवीरांना चंद्राजवळ पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. अपोलो मोहिमेत देखील इतकाच कालावधी चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागला होता.

