कोकण विशेषराजकारण

कोकणातील हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालमधील तज्ञांची मदत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्तींचा उपद्रव वाढल्याने आता पश्चिम बंगालमधील १५ तज्ज्ञांची टीम मदतीला धावून आली आहे.

सावंतवाडी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या जंगली हत्तींच्या नियंत्रणासाठी पश्चिम बंगाल मधील तज्ञांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी दोडामार्ग तालुक्यात १५ जणांची टीम दाखल झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील गावांमध्ये हत्तींचा उपद्रव प्रचंड वाढला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सध्या काजूचा हंगाम सुरू असताना हत्ती काजूच्या बागांमधून बाहेर पडायला तयार नाहीत. काजूच्या बोंडांच्या वासामुळे हत्ती बागांमध्येच ठाण मांडून बसले असून, यामुळे बागायतदारांना बागेत जाणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हत्तींना हुसकावून लावण्यासाठी अखेर पश्चिम बंगाल राज्यातील १५ जणांची प्रशिक्षित टीम दोडामार्गमध्ये दाखल झाली आहे.

​दोन कळप पुन्हा एकत्र?

गेल्या काही दिवसांपासून हत्तींचे दोन वेगळे कळप झाले होते. मात्र, आता पुन्हा हे हत्ती एकत्र आले असून त्यांचा वावर नेतर्डे, सासोली आणि घोटगेवाडी परिसरात वाढला आहे. एका कळपात आता लहान पिल्लेही सोबत आहेत. रविवारी सायंकाळी घोटगेवाडी-मोर्ले मार्गावर मुख्य रस्त्यावरच हत्तींचे दर्शन झाल्याने शेतकरी,प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. वन विभागाने हत्तींना हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले, तरीही हत्ती काजू बागा सोडून जायला तयार नाहीत.

​पश्चिम बंगालच्या टीमकडून मदतीचा हात:

पश्चिम बंगालमध्ये जंगली हत्तींचे प्रमाण मोठे असल्याने, तेथील टीमला हत्तींना कशा प्रकारे हाताळायचे याचे विशेष प्रशिक्षण असते. ही १५ जणांची टीम आता स्थानिक वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हत्तींना सुरक्षित मार्गाने हुसकावून लावण्याचे काम करणार आहे. हत्तींच्या या उपद्रवामुळे काजू, केळी आणि बांबू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हत्तींना मानवी वस्ती किंवा बागायतींपासून लांब ठेवून तिलारी वन राखीव क्षेत्रात पाठवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हत्तींसोबतच आता माकड आणि साळिंदर यांच्याकडूनही काजू बियांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम वन विभागाकडून सुरू आहे. काजू बी नुकसान भरपाई दिली जावी, यासाठी वन विभागाने तसा प्रस्ताव शासनाकडे मांडला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी दोडामार्गवासीयांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *