विश्वासंचार

Old Dinosaur Egg | दक्षिण अमेरिकेत सापडले सात कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोरचे अंडे

Old Dinosaur Egg | दक्षिण अमेरिकेत सापडले सात कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोरचे अंडे

ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) : दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामध्ये डायनासोरचे एक दुर्मीळ अंडे सापडले आहे. हे अंडे सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वीचे असून, ते अत्यंत सुस्थितीत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ही एक ऐतिहासिक शोधमोहीम असून, यामुळे डायनासोरच्या जीवनाबद्दलची आपली समज पूर्णपणे बदलू शकते.

अर्जेंटिनातील नॅशनल सायन्सेस म्युझियमच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. पॅलेओन्टोलॉजिस्ट फेडेरिको एग्नोलिन आणि मॅटियास मोट्टा यांच्या मते, दक्षिण अमेरिकेत सापडलेले हे मांसाहारी डायनासोरचे पहिले संपूर्ण अंडे आहे. हे अंडे लांब मानेच्या ‘सॉरोपॉड’ डायनासोरच्या गोल अंड्यांसारखे नसून, आजच्या पक्ष्यांच्या अंड्यांप्रमाणे अंडाकृती आहे. अंड्याच्या कवचावरील खुणांवरून असे वाटते की, हे अशा प्रजातीचे असू शकते जी आतापर्यंत जगाला अज्ञात आहे. संशोधक या वर्षाच्या अखेरीस या अंड्याचे मायक्रो-सीटी स्कॅन करणार आहेत. या स्कॅनमुळे अंड्याच्या आत भ—ुण किंवा सांगाडा आहे का, हे स्पष्ट होईल.

जरी पूर्ण सांगाडा नसला, तरी त्यातील अवशेषांवरून त्या डायनासोरची वाढ, पोश्चर आणि श्वसन संस्था कशी होती, याची महत्त्वाची माहिती मिळू शकेल. आतापर्यंत फक्त सांगाड्यांवरून डायनासोरच्या स्वभावाचा अंदाज लावला जात होता; मात्र या शोधामुळे त्यांच्या सामाजिक वर्तणुकीवर प्रकाश पडणार आहे :

1. घरटे बांधण्याची पद्धत : दक्षिण अमेरिकेत अद्याप मांसाहारी डायनासोरच्या घरट्यांचा पुरावा सापडलेला नव्हता. हा शोध तो दुवा सांधण्यास मदत करेल.

2. काळजी घेण्याची वृत्ती : डायनासोर आपल्या पिलांची काळजी आजच्या पक्ष्यांप्रमाणे घेत होते की सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे अंडी घालून सोडून देत होते, याचे रहस्य यातून उलगडणार आहे.

3. उत्क्रांतीचा प्रवास : सरपटणारे प्राणी ते आजचे पक्षी यांच्यातील उत्क्रांतीचा टप्पा समजून घेण्यासाठी हे अंडे मैलाचा दगड ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *