राजकारण

BJP Orunodoi Scheme vs Ladki Bahin: लाडकी बहीण पॅटर्न आसाममध्येही? महिलांच्या खात्यात १९ हजार; गोगोईंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडणार?

Assam Assembly Election 2026 BJP Orunodoi Scheme compared to Maharashtra Ladki Bahin: आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच भाजपाच्या ‘अरूणोदय’ योजनेची मोठी चर्चा आहे. महिला मतदारांच्या खात्यात जमा होणारे १९ हजार रुपये आणि मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियानाचा प्रभाव मतदानावर कसा होईल?

ssam Assembly Election 2026: आसाममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आसाममधील खोवांग मतदारसंघात भाजपा आमदार चक्रधर गोगोई व आसाम जातीय परिषद पक्षाचे लुरिनज्योती गोगोई यांच्यात सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर शंतनू बोर्काकोती (३०) याने आसाममध्ये निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याबाबत मत मांडले. “माझ्यासारखे तरूण मतदार लुरिनज्योती यांना पाठिंबा देतील, पण महिलांचा पाठिंबा भाजपा आमदाराला आहे, असं माझं निरीक्षण आहे “, असे शंतनू म्हणाला. शंतनूने त्याचे मत व्यक्त केल्यानंतर त्याची आई रूपाली (६३) यांनी गालावर हळूवार हसू आणत मुलाच्या निरीक्षणाला मूक संमती दिली. महाराष्ट्रात महायुती सरकारने ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना लागू केली होती. त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला होता. तसाच फायदा आता आसाममध्ये भाजपाला होणार का ? हे जाणून घेऊयात.

निवडणुकीआधी लाभार्थी महिलांच्या खात्यात १९ हजार रूपये जमा

शंतनूच्या आई रूपाली या विधवा आहेत. त्या मुलासह एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करतात. तसेच त्यांचे गावातच एक छोटे दुकान आहे. “मला वाटतं असोनी (योजना) सुरू राहायला हवी”, असे रूपाली म्हणाल्या. त्यांना आसाममधील भाजपा सरकारकडून अरूणोदय योजनेअंतर्गत प्रति महिना १२५० रूपये मिळतात. गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या सध्या ४० लाख लाभार्थी महिला आहेत. दरम्यान, आसाम सरकारने मागील महिन्यात (मार्च) लाभार्थी महिलांच्या खात्यात चार महिन्यांच्या थकलेल्या हप्त्यांचे ५ हजार व बिहू गिफ्ट म्हणून ४ हजार असे एकूण नऊ हजार रूपये जमा करणे सुरू केले आहे.

त्याचबरोबर आसाममधील भाजपा सरकारने ‘मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना शेतीसाठी बियाने खरेदी करण्यासाठी ८५ हजार रूपये तीन वर्षांच्या कालावधीत दिले जातात. या योजनेच्या २८ लाख ५० हजारांहून अधिक महिला लाभार्थी आहेत. त्यांच्या खात्यात दहा हजार रूपये जमा करणे आसाम सरकारने सुरू केले आहे. आसाममध्ये अनेक योजनांअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. परंतु, दुसरीकडे महागाई देखील वाढत असल्याकडे काही महिला लाभार्थींनी लक्ष वेधले.

ग्रामीण भागात महिलांमध्ये योजनेबाबत उत्साह

जेरिना बेगम (४२) यांचे पती दिब्रूगड येथे चहाच्या मळ्यात काम करतात. अरूणोदय योजना व बिहू गिफ्टचे ९ हजार व मुख्यमंत्री उद्यमिता योजनेचे १० हजार असे एकूण १९ हजार रूपये खात्यात जमा झाल्याचे जेरिना यांनी सांगितले. या पैशांनी ब्यूटी पार्लरला लागणारे साहित्य विक्रीसाठी खरेदी केल्याचे त्या म्हणाल्या. तर त्यांच्या भगिनी शाहनाज बेगम (४९) यांनी त्यांना मिळालेल्या १९ हजार रूपयांतून कोंबड्या विक्रीसाठी खरेदी केल्याचे सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आसामच्या गाव खेड्यांमध्ये महिलांमध्ये योजनांमधून मिळणाऱ्या पैशांबाबत उत्साह तसेच चर्चा रंगत आहेत. दरम्यान, अरूणोदय योजनेचा हप्ता १२५० वरून ३००० रूपयांपर्यंत वाढवण्याचे व २५ लाख महिलांना योजनेत जोडण्याचे आश्वासन भाजपाने जाहीरनाम्यात दिले आहे.

काँग्रेस महिलांना देणार ५० हजार रूपये

महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्यावर राजकीय बंधने येतात असा आरोप काँग्रेसने भाजपावर केला आहे. आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई म्हणाले, “भाजपात सामील होण्यासाठी महिलांना बळजबरी केली जात आहे. भाजपासाठी त्यांना राजकीय कामे करण्यासाठी भाग पाडले जात आहे. तसेच त्यांना बळजबरीने भाजपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागत आहे. ” दरम्यान, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांच्या बँक खात्यात ५० हजार रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना उद्योग उभारण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी ही रक्कम दिली जाणार आहे.

आसाममधील भाजपा सरकारकडून तरूणांनाही आर्थिक मदत

आसाममधील भाजपा सरकारने पदव्युत्तर शिक्षण झालेल्या तरूणांना प्रति महिना २ हजार रूपये, तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रति महिना १ हजार रूपये देणारी ‘निजूत बाबू असोनी’ ही योजना लागू केली आहे. कुटुंबाचे उत्पन्न ४ लाखांहून अधिक नसावे, अशी त्यासाठी अट आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘जीवन प्रेरणा’ योजना लागू करण्यात आली. या अंतर्गत नुकतेच पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याना प्रति महिना २ हजार ५०० रूपये दिले जात आहेत. तर आसाम राज्यातील किंवा केंद्र सरकारच्या विद्यापीठात संशोधन करणाऱ्या आसामी विद्यार्थ्यांना २५ हजारांची मदत एकरकमी एकदाच दिली जात आहे. तसेच चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या ६.८ लाख कामगारांच्या खात्यात ५ हजार रूपये एकदाच जमा केले जात आहेत.

“अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता”, रोहिणी खडसेंनी केला होता आरोप

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै २०२४ मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. दोन कोटी ४७ लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्या सर्वांना महिन्याला १५०० रुपये दिले गेले. राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेली पंधरा महिने सुरू झालेली पडताळणी मार्च २०२६ अखेर संपली. या पडताळणीत एकूण दोन कोटी ४७ लाख लाडक्या बहिणींपैकी ७२ लाख लाडक्या बहि‍णी नावडत्या ठरल्या आहेत. सरकार आता एक कोटी ७५ लाख लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये अनुदान देणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यानी सरकारवर टीका केली होती. “सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहीणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे ? म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहीणींना पैसे दिले. निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहीणींवरचे प्रेम कमी होऊ लागले. शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता!”, असा घणाघात रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर केला होता. आता आसाममध्ये देखील निवडणुकीआधी लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा करून नंतर त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे का? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात महायुतीला कसा झाला फायदा?

महाराष्ट्रात महायुती सरकारने २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या काही महिने अगोदर लाडकी बहीण योजना लागू केली होती. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात दोन महिन्यांचे हप्ते म्हणजे ३००० रूपये एकदाच जमा केले होते. महाराष्ट्रात महिला मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २ कोटी ५३ लाख महिला मतदारांनी मतदान केले होते, तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ३ कोटी ६ लाख महिलांनी मतदान केले. महिला मतदारांच्या संख्येत तब्बल ५२ लाख ५८ हजार इतकी वाढ झाली होती. परिणामी महायुतीला महाराष्ट्रात २८८ पैकी २३४ जागांवर दणदणीत विजय मिळाला. भाजपाला १३२ जागांवर विजय मिळाला. दरम्यान, आसाममधील भाजपा सरकारने २०२१ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच अरूणोदय योजना राबवत महिलांना प्रति महिना ८५० रूपयांची मदत दिली होती. आता या योजनेअंतर्गत प्रति महिना १२५० रूपये आसाम सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा केले जातात. ही रक्कम ३००० रूपये करण्याचे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *